राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राशन मिळवण्यासाठी सर्व रेशनकार्डधारकांना ‘ई-केवायसी’ करणे अनिवार्य आहे. अन्न आणि सार्वजनिक मंत्रालयाने याचे निर्देश आधीच दिले आहेत. पण तरीही अनेक रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत शेवटची तारीख दिली आहे.
जर रेशनकार्डधारकांनी 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी केली नाही तर त्यांना राशन मिळणार नाही. तसेच, अशा रेशनकार्डधारकांची नावेही कार्डमधून काढली जाणार असून त्यांचे कार्डही रद्द केले जाणार आहे.
रेशनकार्डमध्ये नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन तिथे असलेल्या ई-पॉस डिजिटल मशीनमध्ये आधार क्रमांक जोडावा. ही प्रक्रिया काही सेकंदांत पूर्ण होते, आणि ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच लाभार्थ्यांना राशन मिळणार आहे. हातकणंगले तालुक्याचे पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी सांगितले की प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया मोफत सुरू आहे. प्रत्येक रेशनकार्डधारकांनी आपल्या परिवारातील सदस्यांची केवायसी ही ई-पॉस मशीनच्या मदतीने करून घ्यावी. आधार क्रमांक घालून ही प्रक्रिया पूर्ण होते. ही प्रक्रिया न करणाऱ्यांचे राशन बंद होणार असल्याचे काळगे यांनी सांगितले.
पारदर्शकतेचा उद्देश
ज्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे, त्यांनाही आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया करू शकतात. ई-केवायसी अपडेट करण्यामागचा उद्देश म्हणजे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे आहे.
1 नोव्हेंबरपासून राशन बंद होण्याची शक्यता
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गरिबांना रेशन पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्डधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली आहे. या प्रक्रियेने बनावट लाभार्थ्यांचा शोध घेता येईल. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे राशन आणि रेशनकार्ड 1 नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.